श्री धारावी देवी माता, एक जागृत देवस्थान व एक ऐतिहासिक मंदिर

तारोडी, भाईंदर पश्चिमेला डोंगरात श्री धारावी देवीचे ऐतिहासिक मंदिर आहे. धारावी बेटात निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या कुशीत वसलेले धारावी मातेचे मंदिर भक्तांना नेहमीच साद घालते. सदर मंदिराच्या स्थापनेविषयी
नेमकी माहिती नसली तरी हे मंदिर पेशवेकाळाच्याही आधी बांधलेले आहे. चिमाजी अप्पांनी आपल्या दैदीप्यमान कामगिरीच्या जोरावर वसईला पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी वसई किल्ल्यावर आक्रमण करण्यापूर्वी
श्री धारावी मातेचे दर्शन घेतले होते. इंग्रजांच्या राजवटीत दि. १० सप्टेंबर १८६७ रोजी, मुंबई इलाख्याचे तत्कालीन गव्हर्नर श्री. रॉबर्ट आर्ट साहेब यांनी सनद लिहून दिलेली आहे, त्यात मातेच्या मंदिराच्या
दिवाबत्तीसाठी प्रतिवर्षी रु. १५/- मंजूर केले होते. दिवाबत्तीची रक्कम त्याकाळी कस्टम अधिकार्यांकडे देण्यात येत होती.
स्वयंभू, मनोकामना पूर्ण करणारी, जागृत देवस्थान म्हणून ओळखली जाणारी धारावी माता तामण आगरी कोळी समाजाची श्रद्धास्थान आहे. पंचक्रोशीतल्या आगरी कोळ्यांची ही माता आज सर्व जातीधर्माची आई झालेली आहे. आगरी, कोळी,
ख्रिस्ती, जैन, मारवाडी तसेच इतर सर्व धर्माचे लोक आईच्या दर्शनाला नियमित येतात. येथील ख्रिस्ती धर्माच्या घरातला कोणतेही शुभकार्य मातेच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय होत नाही. खरेतर महाशिवरात्रीला श्री महादेवाची
पूजा केली जाते, परंतु श्री धारावी मातेला साक्षात देवी पार्वती, उमा, गिरीजा व गौरी यांचे रूप मानले जाते.

श्री धारावी देवी मंदिर हे पूर्वी कौलारू होते. नवीन मंदिराचे बांधकाम हाती घेण्यासाठी अध्यक्ष स्वर्गवासी हरिश्र्चंद्र केशव पाटील (मुर्धा) यांच्या अध्यक्षतेखाली, स्वर्गवासी गणपत तुकाराम बने (उत्तन),
स्वर्गवासी गोविंद बाळाजी पाटील (मुर्धा) यांच्या पुढाकाराने स्थानिक ग्रामस्थांची एक कमिटी स्थापन केली व देवीच्या नवीन मंदिराचा भूमिपूजन समारंभ लोक वर्गणीतून दि. १३ डिसेंबर १९७३ रोजी मा. मोरेश्र्वर नारायण
पाटील- अध्यक्ष, कृषी व सहकार समिती, जिल्हा परिषद ठाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. मंदिराच्या विश्वस्त मंडळाची नोंदणी सन १९९६ साली करण्यात आले होती.
श्री धारावी देवीच्या आशीर्वादाने भाविकांच्या श्रद्धा व अनुभूतीमुळे भाविकांची संख्या वाढतच आहे. आठवड्याच्या दर मंगळवार व बुधवार या दिवशी देवीला पहाटे अभिषेक घातला जातो, त्यासाठी मंदिर ट्रस्टने मंदिर
परिसरात भक्तांसाठी भक्त निवास बांधलेले आहे. सदरचे भक्त निवास स्व. हरिश्र्चंद्र केशव पाटील (माधवराव) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुपुत्रांनी बांधलेले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून मंदिर
परिसरात लहान मुलांसाठी घसरगुंडी, पाळणे, झुले तसेच अनेक प्रकारची मनोरंजनाची साधने लावलेली आहेत. भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय कलेली आहे. मिरा भाईंदर मधील स्थानिक संस्था शाळेतील मुलांच्या सहल
धारावी देवी मंदिरात घेऊन येतात तसेच स्थानिक संस्था मुलांच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शारीरिक प्रात्यक्षिकांचे शिक्षण देण्यासाठी मंदिर परिसरात रात्रंदिवस वास्तवास वास्तव्य करून मुलांना मल्लखांब, लाठी
चालवणे, दोरीवरून उंच ठिकाणी चढणे तसेच अनेक प्रकारची शारीरिक क्रीडायोग्य शिकवतात व त्यासाठी मंदिर ट्रस्ट सर्व प्रकारचे सहकार्य केले जाते.
मिरा भाईंदर परिसरातील स्थानिक शाळांतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शाळेतील फी, श्री धारावी देवी मंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येते. श्री धारावी देवीच्या महाशिवरात्री उत्सव व नवरात्र उत्सवाच्या
काळात मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी मोफत वाहनाची सोय केली जाते. सन १९७३ साली बांधलेल्या मंदिराच्या कळसावर कलशारोहणाचा सोहळा बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते दि. ०७ फेब्रुवारी २०१८ रोजी संपन्न
झाला. मिरा भाईंदर पंचक्रोशितील लाखो भाविक कलशारोहणाच्या कार्यकमास उपस्थित होते. सन १९७३ साली बांधलेल्या मंदिरास आता ५० वर्षे झाली असल्याने श्री धारावी देवी मंदिर ट्रस्टने नवीन मंदिर बांधण्याचे ठरविले आहे.
नवीन मंदिर हे काळ्या दगडाचे बांधण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी श्री धारावी देवीच्या भक्तांना देणग्यांसाठी आवाहन केले आहे. श्री धारावी मातेचे नवीन मंदिर हे आपल्या पंचक्रोशीत एक उत्कृष्ट मंदिर असेल आणि
त्यासाठी लागणारा निधी देवीचे भक्त मोठ्या निष्ठेने देतील असा विश्वास मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.