नविन मंदिर

श्री धारावी देवी मातेचे काळ्या पाषाणातील नवीन ऐतिहासिक मंदिर

तारोडी, भाईंदर पश्चिमेला डोंगरात श्री धारावी देवीचे इतिहासकालीन मंदिर आहे. धारावी बेटात निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या कुशीत वसलेले धारावी मातेचे मंदिर भक्तांना नेहमीच साद घालते. सदर मंदिराच्या स्थापनेविषयी नेमकी माहिती नसली तरी हे मंदिर पेशवेकाळाच्याही आधी बांधलेले आहे. चिमाजी अप्पांनी आपल्या दैदीप्यमान कामगिरीच्या जोरावर वसईला पोर्तुगिजांच्या जोखडातुन मुक्त करण्यासाठी वसई किल्ल्यावर आक्रमण करण्यापुर्वी श्री धारावी मातेचे दर्शन घेतले होते. इंग्रजाच्या राजवटीत दि.१० सप्टेंबर १८६७ रोजी, मुबंई इलाख्याचे तत्कालीन गव्हर्नर श्री. रॉबर्ट आर्ट साहेब यांनी सनद लिहून दिलेली आहे त्यात मातेच्या मंदिराच्या दिवाबत्तीसाठी प्रतिवर्षी रु.१५/- मंजुर के ले होते. दिवाबत्तीची रक्कम त्याकाळी कस्टम अधिकाऱ्यांकडे देण्यात येत होती.
देवीचे पुरातन मंदिर हे मातीच्या भिंतीचे व कौलारु होते. सन १९७३ साली मंदिर ट्रस्टने आरसीसीचे पक्के मंदिर बांधून त्यास आता ५२ वर्षे झाली असल्याने श्री धारावी देवी मंदिर ट्रस्टने नवीन मंदिर बांधण्याचे ठरविले आहे. नवीन मंदिर हे काळ्या दगडाचे (बेसल्ट स्टोन) बांधण्यात येत आहे. त्यासाठी लागणारा दगड नादेड (महाराष्ट्र) येथून आणण्यात आला आहे. बेसल्ट स्टोन हा दगड जमीनीतुन खोदुन काढण्यात येतो. ह्या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे, पावसाच्या पाण्याने हा दगड दिवसेंदिवस काळा होत जातो. नवीन मंदिराचे काम मे. जय भवानी कन्स्ट्रक्शन, नांदेड चे श्री. संतोष जाधव यांना देण्यात आले आहे. नवीन मंदिराच्या पुर्ण बांधकामाचा कालाविधी दोन वर्षाचा आहे श्री धारावी मातेचे नवीन मंदिर हे आपल्या पंचक्रोशीत एक उत्कृष्ठ मंदिर असेल असा विश्वास मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.
श्री धारावी देवी मंदिरट्रस्ट,तारोडी